रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मेघदूत शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

May 13, 2026 - 22:44
 0  9
रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
रायगड पर्यटन, शंभूराज देसाई, आदिती तटकरे, महाराष्ट्र पर्यटन विकास, स्वदेश दर्शन योजना, स्टार गेझिंग प्रकल्प, रायगड विकास, पर्यटन विभाग बैठक, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ

मुंबई, दि. १३ :

रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध पर्यटन प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मेघदूत शासकीय निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघातील पर्यटन विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार सुनील तटकरे, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक रविंद्र पवार तसेच रायगड जिल्ह्यातील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून जिल्ह्यातील पर्यटनविषयक कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत. प्रादेशिक पर्यटन विभागांतर्गत प्रलंबित कामांची सद्यस्थिती लक्षात घेऊन आवश्यक निधीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत. उपलब्ध निधीतून प्राधान्यक्रमानुसार कामांना निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

तसेच स्टार गेझिंग (आकाश निरीक्षण) प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासी न्याहारी (Bed & Breakfast) नोंदणी मोहिमेसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटन प्रकल्पांचे प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कासव संवर्धन प्रकल्प आणि पेशवे स्मारक यांसारख्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. पर्यटन विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वदेश दर्शन योजनेंतर्गत निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासी न्याहारी नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सुचविले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0