शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’; राष्ट्रपतींच्या हस्ते कुटुंबीयांनी स्वीकारला सन्मान
अकोला जिल्ह्यातील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत दाखविलेल्या अद्वितीय शौर्यासाठी मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी आणि आई यांनी हा सन्मान स्वीकारला.
नवी दिल्ली, दि. ९ : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी आणि भारतीय सेनेतील महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष रक्षा अलंकरण सोहळा मध्ये हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई शाहू प्रभाकर जंजाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्याला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत अतुलनीय शौर्य
६ जुलै २०२४ रोजी काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान शिपाई प्रवीण जंजाळ आपल्या तुकडीसह कार्यरत होते. मोहिमेदरम्यान काही संशयास्पद हालचाली त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांना सतर्क केले. त्याचवेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पळून जाण्याच्या उद्देशाने अंधाधुंद गोळीबार सुरू केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रवीण जंजाळ यांनी असामान्य धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत दहशतवाद्यांचा पाठलाग केला. स्वतःच्या अचूक गोळीबारातून त्यांनी दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीदरम्यान त्यांच्या डोक्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, गंभीर अवस्थेतही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवत मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
शौर्याचा सर्वोच्च गौरव
त्यांच्या अदम्य शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेची दखल घेत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्याची घोषणा केली होती. देशाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0