भारतात एआय क्षेत्रात मोठ्या रोजगार व गुंतवणुकीच्या संधी; एआय-एमएल शिक्षणासाठी बीएससी (ऑनर्स) उपयुक्त – विवेक वेलणकर, डॉ. संजय गांधी
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) क्षेत्रात भारतात भविष्यात सर्वाधिक रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार असल्याचे मत करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात एआय आणि एमएलमधील करिअरच्या नव्या संधींवर मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, पुणे, दि. १५ जून २०२६ : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) बाबत सध्या जगभरात उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी भविष्यात एआय हा संगणक आणि मोबाईलप्रमाणेच सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. भारत हा एआय वापराच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मजबूत पायाभूत सुविधांमुळे भविष्यात एआय क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार आणि गुंतवणूक भारतात होईल, असा विश्वास प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केला.
पुण्यातील ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स संस्था आणि रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (BATU) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाटुचे कुलसचिव डॉ. अमित शेष, ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय गांधी, आयआयटी वाराणसीचे डॉ. शैलेंद्र शुक्ला, रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे उपव्यवस्थापक मंदार हलभावी, उद्योजक मनोज देशमुख आणि प्रशांत पुंड उपस्थित होते.
विवेक वेलणकर म्हणाले की, शिक्षण, शेती, उद्योग, सेवा, वैद्यकीय, वाणिज्य आणि कला यांसह सर्वच क्षेत्रांमध्ये एआयचा वापर झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे पारंपरिक कोडिंग आणि प्रोग्रामिंगच्या काही नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी एआय टूल्स विकसित करणारे, मशीन लर्निंग तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट आणि एआय अभियंत्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी महाविद्यालय निवडताना कॅम्पस प्लेसमेंट, उद्योगांशी असलेले संबंध आणि इंटर्नशिपच्या संधींना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अमित शेष यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग’ बीएससी (ऑनर्स) हा अभिनव पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याशिवाय ट्रिपल आयटी, अलाहाबादसारख्या प्रतिष्ठित संस्थांबरोबरही विद्यापीठाचे शैक्षणिक करार झाले आहेत.
विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी विद्यापीठ विविध उद्योगसंस्थांशी समन्वय साधत आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ९२ स्टार्टअप्सची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय इन्क्युबेशन स्टार्टअप धोरणांतर्गत दरवर्षी २५ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक डॉ. संजय गांधी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स संस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत १०० हून अधिक स्टार्टअप्सना मार्गदर्शन केले आहे. बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला चार वर्षांचा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीएससी (ऑनर्स)’ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एआयसोबत क्वांटम कम्प्युटिंगचेही ज्ञान देणार आहे.
या अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात इंटर्नशिपची संधी दिली जाणार असून त्यासाठी स्टायपेंडही उपलब्ध असेल. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव प्रमाणपत्राद्वारे दिला जाणार आहे. १२+४ वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमाचा देश-विदेशातील उच्च शिक्षणासाठीही मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिधा गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित गांधी यांनी केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1