पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिकेची जय्यत तयारी; वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षा सुविधांचे नियोजन
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने पालखी मार्गाची पाहणी करून वारकऱ्यांसाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, मोबाईल टॉयलेट्स, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा सुविधांचे व्यापक नियोजन केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे, दि. १५ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी आगमन होणार असून त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने पालखी मार्गावरील विविध सुविधा आणि कामांचा आढावा घेत व्यापक नियोजन सुरू केले आहे. यासाठी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, आमदार हेमंत रासने, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, मुक्कामस्थळांची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. येरवडा-कळस-धानोरी, औंध-बाणेर, भवानी पेठ आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
म्हस्के वस्ती, कळस येथील नाल्यावरील कल्व्हर्टची साफसफाई, नाल्यांची खोली वाढविणे, पालखी मार्गावरील सर्व चेंबर्सची तपासणी आणि लोखंडी जाळ्या बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळी गटारे आणि पाईपलाइनची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यासही सांगण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गावरील परिसर २४ तास स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून आवश्यक ठिकाणी कचरा संकलन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पालखी मार्गावर वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असून पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर आणि अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी मार्गावरील विविध ठिकाणी विश्रांती व आराम कक्ष उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. फिरते दवाखानेही सेवेसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
वाहतूक पोलीस विभागाच्या समन्वयातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. पालखी दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन बॅरिकेड्स आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी अग्निशमन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पाणीपुरवठा विभागाकडून पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि दिंड्यांच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच देखभाल आणि दुरुस्तीसाठी २४ तास विशेष यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोबाईल टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
याशिवाय पालखी मुक्कामस्थळांजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरुस्त करून कार्यान्वित केली जाणार असून शाळांमध्ये मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांसाठी पाणी आणि स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून पालखीपूर्वी औषध फवारणी मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0