सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून येरवडा खुले कारागृहात भव्य प्रासादिक कीर्तन सोहळा; 150 बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा खुले जिल्हा कारागृहात ह.भ.प. निलेश महाराज झरेगावकर यांच्या प्रासादिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 150 बंद्यांनी सहभाग घेतला असून अध्यात्म, संस्कार आणि पुनर्वसनाचा संदेश देण्यात आला.
मनिषा गुरव - चीफ एडिटर
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी देवाची, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा खुले जिल्हा कारागृह येथे दिनांक 9 जून 2026 रोजी भव्य आणि भक्तिमय वातावरणात प्रासादिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कारागृहातील सुमारे 150 बंद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कारागृह विभागाच्या "सुधारणा व पुनर्वसन" या ब्रीदवाक्यानुसार बंद्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या मानसिक व नैतिक उन्नतीसाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून या विशेष कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी क्रांतिकारी कीर्तनकार ह.भ.प. श्री. निलेश महाराज झरेगावकर यांनी आपल्या रसाळ आणि प्रभावी कीर्तनातून भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर महाराज, वाल्मिकी ऋषी, जगतसद्गुरु तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा उल्लेख करत मानवी जीवनातील सद्गुणांचे महत्त्व, चुका सुधारण्याची संधी आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश दिला.
कीर्तनादरम्यान संपूर्ण कारागृह परिसर "ज्ञानोबा-तुकाराम" यांच्या गजराने दुमदुमून गेला. बंद्यांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून कीर्तनातील प्रबोधनात्मक विचारांनी उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक श्री. शामकांत शेडगे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील "आता तरी पुढे, हाचि उपदेश, नका करू नाश आयुष्याचा" या ओव्यांचा उल्लेख करून कीर्तनाचा सार व्यक्त केला. तसेच बंद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अशा अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हा उपक्रम मा. डॉ. सुहास वारके (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक श्री. योगेश देसाई आणि कारागृह उपमहानिरीक्षक श्री. सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. नागेश एम. कांबळे, तुरुंग अधिकारी श्रेणी-2 श्री. नागनाथ भानवसे, सुभेदार सुनील गायकवाड, बालाजी सावंत, दत्तात्रय चव्हाण, हवालदार राजेंद्र धनगर, प्रकाश भोसले, कारागृह शिपाई विजयकुमार दिवेकर, तोसिफ शेख, निलेश मांढरे, महिला शिपाई सरला साबळे, सुरेखा म्हेत्रे, संध्या जाधवर, मोनिका लांडगे तसेच सर्व बंदीबांधव उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

