अधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन समस्या सोडवाव्यात – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नाशिकमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले.

Apr 6, 2026 - 04:20
 0  5
अधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन समस्या सोडवाव्यात – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे, नरहरी झिरवाळ, दादाजी भुसे

श्रीमती माधुरी अनिल वैद्य - नाशिक ब्यूरो

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी तत्काळ सोडविणे आवश्यक आहे. आठवड्यातून निश्चित दिवशी अधिकारी गावभेटी देऊन तक्रारींचे निवारण करतील, यामुळे नागरिकांना गतिमान प्रशासनाचा अनुभव मिळेल.

या बैठकीस दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, तसेच विविध आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागासाठी राज्य शासनाने नवीन आकृतीबंध तयार करून आवश्यक पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा देणे अपेक्षित असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. जमिनीच्या नोंदी, फेरफार, परवानग्या यांसारखी कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

नागपूर जिल्ह्यातील ‘नागपूर पॅटर्न’चा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सहदुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करण्यास सांगितले.

भूमी अभिलेख विभागाने प्रलंबित मोजणी कामे लवकर पूर्ण करावीत, तसेच विकास प्रकल्पांसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. घरकूल योजनांसाठी वाळू उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कृत्रिम वाळू प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय शासकीय कार्यालयांच्या छतांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यावरही भर देण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ई-ऑफिस प्रणालीमुळे कामाचा वेग वाढल्याची माहिती दिली. तसेच महसूल वसुलीत यंदा २० कोटी ५२ लाख रुपयांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी स्वीकारल्या आणि तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0