मुंबई महानगरपालिकेतील १००० कोटींचे टेंडर रद्द; काँग्रेसची चौकशी व कारवाईची मागणी
मुंबई महानगरपालिकेतील १००० कोटींचे टेंडर रद्द झाल्यानंतर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकशी व श्वेतपत्रिकेची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील तब्बल १००० कोटी रुपयांचे टेंडर रद्द झाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजकारण तापले असून काँग्रेसने सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ टेंडर रद्द करून चालणार नाही, तर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
राजहंस यांनी आरोप केला की, महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कंत्राटांवरून अंतर्गत वाद सुरू आहेत. प्रशासक राजवटीत मुंबईकरांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचे काँग्रेसने पुराव्यांसह उघड केले असून, १००० कोटींचे टेंडर रद्द होणे म्हणजे त्या आरोपांची पुष्टीच आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला असून सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांना फायदा करून देत स्वतःची घरे भरली आहेत. मुंबईकरांच्या मूलभूत सुविधा जसे आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी आणि बेस्ट सेवा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
भाजपाच्या पारदर्शकतेच्या दाव्यांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, बीएमसीच्या ९० हजार कोटींच्या ठेवींचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. हा पैसा मुंबईकरांचा असून तो कोणत्याही पक्षाचा नाही, हे लक्षात ठेवावे.
तसेच, मुंबईतील मौल्यवान जमीन काही उद्योगपतींना देताना नियम व अटी बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, यामागील सत्य जनतेसमोर आणण्यासाठी सर्व कामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे आव्हान त्यांनी दिले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0