वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडाची राज्यव्यापी वृक्षारोपण मोहीम; एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडामार्फत राज्यभरात एक लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जैवविविधता संवर्धन, शहरी हरित क्षेत्र विस्तार आणि नागरिकांच्या सहभागातून पर्यावरणपूरक व शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Jun 13, 2026 - 00:52
 0  6
वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडाची राज्यव्यापी वृक्षारोपण मोहीम; एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
म्हाडा वृक्षारोपण मोहीम, वन महोत्सव सप्ताह 2026,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. १२ जून २०२६ : वाढते शहरीकरण, हवामान बदल, प्रदूषण आणि तापमानवाढ या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यंदाही राज्यभर व्यापक वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहीम राबविणार आहे. वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडाने राज्यभरात एक लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, अधिक हिरवागार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी परिसर निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.

म्हाडा मुख्यालयात आयोजित नियोजन बैठकीत उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सर्व विभागीय मंडळांना मोहिमेचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. वृक्षारोपण ही केवळ मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी पर्यावरणीय जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी वृक्ष लागवडीबरोबरच त्यांच्या संवर्धन आणि दीर्घकालीन संगोपनावर विशेष भर देण्याची गरज व्यक्त केली.

१ जुलै ते ७ जुलै दरम्यान राज्यभरातील म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक हवामानाला अनुरूप देशी प्रजातींची झाडे तसेच फळझाडांच्या लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. फळझाडांमुळे नागरिकांचा झाडांशी भावनिक संबंध निर्माण होऊन त्यांच्या संवर्धनात अधिक सहभाग वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

मागील वर्षी म्हाडाने राज्यभरात सुमारे दीड लाख वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी सुमारे ८० टक्के वृक्ष आजही अस्तित्वात असून त्यांचे यशस्वी संवर्धन सुरू आहे. तसेच सुमारे १ लाख १४ हजार ८०० वृक्षांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने म्हाडाच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून येते.

यंदाच्या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, रहिवासी कल्याण संघटना (RWA), गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संघटनांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासकीय जबाबदारी नसून ती लोकचळवळ व्हावी, या उद्देशाने जनजागृती उपक्रमही राबविले जाणार आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील बांधकाम अथवा विकासासाठी अनुपयुक्त असलेल्या म्हाडाच्या भूखंडांवर मियावाकी पद्धतीने घनदाट शहरी वनांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कमी जागेत अधिक वृक्षसंख्या आणि समृद्ध जैवविविधता निर्माण करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरणार आहे.

म्हाडाच्या गृहनिर्माण वसाहती, मोकळे भूखंड, सार्वजनिक जागा आणि विविध प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाचे जिओ-टॅगिंग करून त्याच्या वाढीचा आणि संवर्धनाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. तसेच झाडांच्या दीर्घकालीन देखभाल आणि संगोपनाची जबाबदारी स्थानिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि समुदाय गटांना सोपविण्याचा विचार करण्यात येत आहे.

यंदाच्या मोहिमेत ५ ते ६ फूट उंचीची आणि २ ते ३ वर्षे वयोमानाची निरोगी रोपे लावण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. अधिक टिकाऊ वृक्षसंवर्धन, कार्बन शोषण क्षमता वाढविणे, जैवविविधतेचे संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाच्या सामूहिक प्रयत्नांना बळ द्यावे, असे आवाहन केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0