दक्षिण मुंबईतील अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई; शाळा व वर्ग तात्काळ बंद करण्याचे आदेश

दक्षिण मुंबई विभागातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि वर्ग अनधिकृतरित्या चालविले जात असल्याचे आढळून आल्याने शिक्षण विभागाने संबंधित संस्थांना नोटिसा बजावत तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची मान्यता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Jun 12, 2026 - 19:14
Jun 12, 2026 - 19:27
 0  14
दक्षिण मुंबईतील अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई; शाळा व वर्ग तात्काळ बंद करण्याचे आदेश
अनधिकृत शाळा, दक्षिण मुंबई, शिक्षण विभाग, शिक्षण निरीक्षक,

मुंबई प्रतिनिधी देवानंद शिंदे 

मुंबई, दि. 12 : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा आणि शाळांमधील काही वर्ग अनधिकृतरित्या चालविले जात असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थांना नोटीस बजावून अनधिकृत शाळा आणि वर्ग तात्काळ बंद करण्याचे निर्देश दक्षिण मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत.

शिक्षण विभागाच्या तपासणीत या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या असल्याचे समोर आले आहे. तसेच काही शाळा पूर्णपणे अनधिकृतपणे सुरू असल्याचे, तर काही शाळांमध्ये मान्यता नसलेल्या वर्गांचे संचालन सुरू असल्याचे आढळले आहे.

या शाळा पूर्णपणे अनधिकृत

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, खालील शाळांना कोणत्याही वर्गासाठी मान्यता नसून त्या अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळले आहे:

मदनी हायस्कूल, क्रॉफर्ड मार्केट (मस्जीद)

युसुफ मेहर अली हायस्कूल, नारायण तावडे चौक, तुळशीवाडी (ताडदेव)

मदर तेरेसा हायस्कूल, ब्लॉक क्रमांक 11, 90 फूट रोड, धारावी

गणेश विद्यामंदिर, संत कक्कैया मार्ग, धारावी

ऑक्झिलम इंटरनॅशनल स्कूल, बलराम बाबू खाडेकर मार्ग, वडाळा पूर्व

फिनलँड इंटरनॅशनल School, माहेश्वरी निकेतन, गोपाळराव देशमुख मार्ग

काही शाळांमधील वर्ग अनधिकृत

काही शाळांना मर्यादित वर्गांसाठी मान्यता असली तरी त्यांच्याकडून अतिरिक्त वर्ग अनधिकृतरित्या चालविले जात असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

मोहम्मदीया हायस्कूल (27 मस्जीद मार्ग) येथे इयत्ता 6 वी ते 8 वीचे वर्ग अनधिकृत आहेत. या शाळेला केवळ इयत्ता 1 ली ते 5 वी आणि 9 वी ते 10 वीपर्यंतच्या वर्गांसाठीच मान्यता आहे.

त्याचप्रमाणे गोल्डन स्पायरल हायस्कूल, परेल (4B, ॲडव्हान्स्ड हाऊस, ताडदेव) येथे इयत्ता 6 वी ते 10 वीपर्यंतचे वर्ग अनधिकृतपणे चालविले जात आहेत. या शाळेला केवळ इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या वर्गांसाठी मान्यता असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन

शिक्षण विभागाने पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षण निरीक्षकांनी संबंधित शाळांना नोटिसा बजावून अनधिकृत वर्ग आणि शाळा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1