‘लाल परी’ झाली ७८ वर्षांची; शेगाव बसस्थानकात उत्साहात साजरा झाला वाढदिवस
महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ने ७८ वर्षांचा प्रवास पूर्ण केला. यानिमित्त शेगाव बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी रांगोळी काढून आणि बस सजवून वाढदिवस उत्साहात साजरा केला.
बुलढाणा प्रतिनिधी महेंद्र मिश्रा
शेगाव : अनेकांच्या सुख-दुःखाची साक्षीदार आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा पोहोचवणारी सर्वसामान्यांची लाडकी ‘लाल परी’ आज ७८ वर्षांची झाली आहे. गेल्या ७८ वर्षांच्या प्रवासात लाखो प्रवाशांच्या आठवणी, आनंद, संघर्ष आणि भावनिक नाती या लाल परीसोबत जोडली गेली आहेत.
आजी, आजोबा, आई-वडील, ताई-दादा अशा सर्व पिढ्यांची विश्वासू सहप्रवासी ठरलेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आजही ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत आहे.
‘लाल परी’च्या वाढदिवसानिमित्त शेगाव बसस्थानकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी आकर्षक रांगोळी काढून बसस्थानक सजवले. तसेच महाकाल नगरीकडे जाणारी एसटी बस फुलांनी आणि सजावटीच्या साहित्याने सजवून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी लाल परीच्या सेवाभावी प्रवासाला सलाम करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात आणि सर्वसामान्यांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एसटी सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

