महागाईविरोधात भांडुपमध्ये शिवसेनेचे तीव्र आंदोलन; राजोल पाटील यांचा सरकारवर घणाघात

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅस दरवाढीविरोधात भांडुप पश्चिम येथे शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यात आला.

Jun 9, 2026 - 22:04
 0  36
महागाईविरोधात भांडुपमध्ये शिवसेनेचे तीव्र आंदोलन; राजोल पाटील यांचा सरकारवर घणाघात
महागाई आंदोलन, राजोल पाटील, भांडुप आंदोलन, शिवसेना उबाठा

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. ९ जून २०२६ : पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून महागाईच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत भांडुप पश्चिम स्टेशन रोड येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

देशभरात वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण होत चालले आहे. किराणा सामान, मुलांचे शिक्षण, प्रवास खर्च, वीजबिले आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. सरकार या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान महिला शिवसैनिकांनी रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. वाढत्या गॅस दरांमुळे भविष्यात सामान्य नागरिकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येईल, असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला. तसेच शिवसैनिकांनी गळ्यात कांदा आणि बटाट्यांच्या माळा घालून वाढत्या महागाईविरोधात आणि सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना नगरसेविका राजोल संजय पाटील म्हणाल्या की, "जनता महागाईच्या आगीत होरपळत असताना सरकार सत्तेच्या सुखात रमले आहे. अच्छे दिनांच्या घोषणा देणाऱ्यांनी आज सर्वसामान्यांच्या घरातील चूल विझवण्याचे काम केले आहे. नागरिकांचे जगणे असह्य झाले असताना सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही."

"दरवाढ बंद करा, जनतेला न्याय द्या", "गॅस दरवाढीने जनता त्रस्त, सरकार मात्र मस्त" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका दिपमाला बढे, सुरेश शिंदे, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

महागाईच्या प्रश्नावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0