मुंबई उपनगरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई; मानखुर्दमध्ये 14 एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने मानखुर्द परिसरात मोठी अतिक्रमण निष्कासन मोहीम राबवत 220 अनधिकृत गोडाऊन आणि गाळे हटवून 14 एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त केली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
मुंबई प्रतिनिधी | देवानंद शिंदे
मुंबई, दि. 11 : मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करत मानखुर्द परिसरातील 14 एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. या मोहिमेदरम्यान शासकीय जागेवर उभारण्यात आलेले 220 अनधिकृत गोडाऊन आणि गाळे हटविण्यात आले.
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून ही विशेष अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्यात आली.
यापूर्वी कुर्ला तालुक्यातील मानखुर्द येथील 11 एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून ती मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर 11 जून रोजी मानखुर्द येथील नगर भूमापन क्रमांक 1/1 तसेच मंडाळे येथील नगर भूमापन क्रमांक 6/1 आणि खाडीलगतच्या शासकीय जागेवर व्यवसायिक वापरासाठी उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली.
220 अनधिकृत गोडाऊन हटविले
कारवाईदरम्यान शासकीय जागेवर उभारलेली सुमारे 220 अनधिकृत गोडाऊन, गाळे आणि अन्य बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईमुळे एकूण 14 एकर शासकीय जमीन पुन्हा शासनाच्या ताब्यात आली आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
मोहीम शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या मोहिमेत:
सुमारे 600 पोलीस अधिकारी व कर्मचारी
150 बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी
100 महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी
10 नगर भूमापन विभागाचे कर्मचारी
यांची नियुक्ती करण्यात आली होती.
अतिक्रमण हटविण्यासाठी 3 पोकलेन मशीन आणि 4 जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.
विविध विभागांचा सहभाग
या मोहिमेत अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे, उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) चेंबूर, उपविभागीय अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त (एम/पूर्व), तहसीलदार कुर्ला, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर भूमापन विभाग आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
शासकीय प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध होणार
अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या जागेचे संरक्षण करून शासनाच्या धोरणानुसार ती विविध शासकीय प्रकल्प आणि विभागांना उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील इतर शासकीय जमिनींवरील अतिक्रमण हटविण्यासाठीही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा आगामी काळात अधिक वेगाने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1