महापौर रितू तावडे यांची म्हाडा मुख्यालयास सदिच्छा भेट; पावसाळी तयारी व डिजिटल सेवांचा घेतला आढावा

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हाडा मुख्यालयाला सदिच्छा भेट देत पावसाळी तयारी, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर, नियंत्रण कक्षाची कार्यपद्धती तसेच नागरिकाभिमुख डिजिटल सेवांचा सविस्तर आढावा घेतला. म्हाडाच्या लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

Jun 13, 2026 - 00:36
 0  16
महापौर रितू तावडे यांची म्हाडा मुख्यालयास सदिच्छा भेट; पावसाळी तयारी व डिजिटल सेवांचा घेतला आढावा
म्हाडा, रितू तावडे, संजीव जयस्वाल, म्हाडा मुख्यालय

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. १२ जून २०२६ : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध नागरी प्रश्नांसह पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान महापौर रितू तावडे यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरू आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अशा इमारतींतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमा, समन्वय यंत्रणा तसेच जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली.

यावेळी जयस्वाल यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या काळात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून नागरिकांच्या तक्रारी, आपत्कालीन परिस्थिती आणि धोकादायक इमारतींशी संबंधित बाबींवर तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नियंत्रण कक्षामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सेवा अधिक प्रभावी करण्यात आल्या आहेत.

महापौर तावडे यांनी म्हाडा मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रालाही भेट दिली. या केंद्रामार्फत नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात असून त्याच्या कार्यपद्धतीची माहिती त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली. तसेच केंद्रात आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि अभिप्रायही जाणून घेतले.

यावेळी संजीव जयस्वाल यांनी म्हाडामध्ये राबविण्यात आलेल्या विविध डिजिटल आणि लोकाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. नागरिक सुविधा केंद्राच्या सेवांचे पूर्णपणे ऑनलाइन रूपांतर करण्यात आले असून आता नागरिकांना घरबसल्या किंवा जगाच्या कोणत्याही भागातून अर्ज, कागदपत्रे आणि प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने सादर करता येत आहेत. त्यामुळे सेवांमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.

महापौरांनी अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली (Visitor Management System - VMS) चीही पाहणी केली. या प्रणालीद्वारे नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांची ऑनलाइन भेट निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुव्यवस्थित होत आहे.

म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नागरिकाभिमुख उपक्रमांचे, डिजिटल सेवांचे आणि पावसाळी तयारीचे महापौर रितू तावडे यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्यासाठी म्हाडा करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.