होलार समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीच्या अभ्यासासाठी समिती; विकासासाठी विशेष उपाययोजना राबविणार

होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असून तिच्या अहवालाच्या आधारे विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.

Jun 17, 2026 - 01:11
 0  2
होलार समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीच्या अभ्यासासाठी समिती; विकासासाठी विशेष उपाययोजना राबविणार
होलार समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीच्या अभ्यासासाठी समिती;

मुंबई प्रतिनिधी, दि. १६ : होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्रालयात होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे तसेच होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय आणि कल्याणकारी उपाययोजना राबविण्यात येतील.

ते पुढे म्हणाले की, 'संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ' अंतर्गत होलार समाज आर्थिक विकास महामंडळ या स्वतंत्र उपकंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली असून समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील समाजबांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी विशेष परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. हे परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांना पाठविले जाणार असून त्याद्वारे योजनांची माहिती आणि लाभ समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल.

होलार समाजाच्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून समाज प्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0