अल निनोचा संभाव्य प्रभाव; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी, जलसंधारणावर भर द्यावा
अल निनोच्या संभाव्य परिणामामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा खंड, दुष्काळसदृश परिस्थिती आणि जलटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याशिवाय पेरणी करू नये, जलसंधारण आणि पीक विम्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर, दि. १५ : जागतिक हवामानावर परिणाम करणारी ‘अल निनो’ ही नैसर्गिक घटना यावर्षीही चर्चेत असून तिचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई न करता कृषी विभाग आणि हवामान खात्याच्या सूचनांनुसारच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, अल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसात खंड पडणे, उष्णतेच्या लाटा वाढणे आणि जलस्रोतांवर ताण येणे यांसारखे परिणाम दिसून येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन, जलसंधारण आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देताना तज्ज्ञांनी सांगितले की, शेततळे, जलसंधारण, शेतरस्त्यांमधील पाणी अडविणे, ओलावा टिकवून ठेवणे यांसारख्या उपाययोजनांवर भर द्यावा. उपलब्ध जलस्रोतांचा वापर ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे कार्यक्षमतेने करावा. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पीक विमा घेणे आवश्यक आहे.
पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनी चारा आणि पाण्याची उपलब्धता याचे आगाऊ नियोजन करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषी विभागाने अधिकृत सल्ला दिल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा दुबार किंवा तिबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अल निनोचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे पाण्याची बचत, वृक्षारोपण, स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, अमेरिका, ब्राझील, फिलिपाईन्स तसेच पॅसिफिक महासागर परिसरातील अनेक देशांवर अल निनोचा प्रभाव जाणवू शकतो. काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये तुलनेने अधिक संवेदनशील मानली जातात. तथापि, प्रत्येक वर्षी परिस्थिती वेगळी असते आणि अंतिम अंदाज हवामान विभागाच्या अधिकृत निरीक्षणांवर आधारित असतो.
तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, जून महिन्यात पाऊस उशिरा येणे म्हणजेच अल निनोचा परिणाम असे थेट म्हणता येत नाही. मान्सूनच्या आगमनावर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कमी दाबाची क्षेत्रे आणि इतर महासागरीय घटकांचाही प्रभाव असतो. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान अंदाजावर भर द्यावा.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार, जलसंधारण प्रकल्प, सूक्ष्म सिंचन, पीक विमा आणि हवामान आधारित कृषी सल्ला यांसारख्या उपाययोजना राबविल्या आहेत. संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणे, बेकायदेशीर पाणी उपसा रोखणे आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक सूचना देणे यावर शासनाचा भर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच शेतीची कामे करावीत आणि अधिकृत हवामान अंदाजावर आधारित निर्णय घ्यावेत, असे आवाहन केले आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विज्ञानाधारित नियोजन, जलसंधारण, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासन-जनसहभाग यांच्या मदतीने अल निनोच्या परिणामांची तीव्रता कमी करता येऊ शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहून योग्य नियोजन करणे काळाची गरज बनली आहे.
लेखक : प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0