पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोल्हापुरात भव्य सायकल रॅली; ३०० हून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक सायकल दिवस आणि पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ या संदेशासह ३०० हून अधिक सायकलस्वार, खेळाडू आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

Jun 6, 2026 - 04:15
 0  3
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोल्हापुरात भव्य सायकल रॅली; ३०० हून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोल्हापुरात भव्य सायकल रॅली;

प्रतिनिधी | कोल्हापूर

‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’चा संदेश; कोल्हापुरातील भव्य सायकल रॅलीत ३०० हून अधिक नागरिक सहभागी

कोल्हापूर, दि. ५ : जागतिक सायकल दिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि माय भारत कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देणाऱ्या या रॅलीत ३०० हून अधिक सायकलप्रेमी, खेळाडू, अधिकारी आणि पर्यावरणप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला.

पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक सायकल क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रॅलीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता सायकल ही केवळ वाहतुकीचे साधन नसून आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे झाडाचे रोप देऊन पर्यावरणपूरक स्वागत केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची अधिकृत सुरुवात केली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चे प्रतिनिधी प्रमोद माने, कोल्हापूर जिल्हा सायकल असोसिएशन चे कपिल कोळी, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मण पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच खेल इंडिया सेंटरमधील खेळाडू, प्रशिक्षक, विविध शाळांतील विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांनीही रॅलीत सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार अमल महाडिक यांच्या वतीने सहभागींसाठी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सर्व सहभागी, पर्यावरणप्रेमी, खेळाडू आणि अधिकारी यांचे आभार मानले. कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0