यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना रखडली? लाभार्थ्यांची शासकीय कार्यालयांत धावपळ

परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होऊनही अनेकांना अद्याप निधी मिळालेला नाही. वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारूनही स्पष्ट माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

May 8, 2026 - 00:24
 0  4
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना रखडली? लाभार्थ्यांची शासकीय कार्यालयांत धावपळ
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, घरकुल योजना

मराठवाडा ब्यूरो लक्ष्मण चौरे 

परभणी : जिल्ह्यातील जितूर, परभणी, पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड आणि पुर्णा तालुक्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असली, तरी अनेक लाभार्थ्यांना अद्याप कोणताही आर्थिक लाभ किंवा निधी मिळालेला नसल्याची गंभीर तक्रार पुढे येत आहे. गेल्या वर्षभरापासून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही योजना प्रत्यक्षात सुरू न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समिती, समाज कल्याण विभाग तसेच संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारूनही त्यांना स्पष्ट माहिती दिली जात नाही. काही लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश मिळाले असले, तरी त्यांच्या खात्यात अद्याप कोणतीही रक्कम जमा झालेली नाही.

योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर मिळण्याची आशा अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांनी बाळगली होती. काहींनी घर बांधणीसाठी प्राथमिक तयारी देखील सुरू केली होती. मात्र निधी वितरण प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे अनेकांचे स्वप्न अधांतरी राहिले आहे.

“गेल्या वर्षभरापासून फॉर्म भरून वाट पाहत आहोत. कार्यालयात गेल्यावर आज-उद्या असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात पैसे मिळाले नाहीत,” अशी प्रतिक्रिया काही लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना तातडीने निधी वितरित करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत संबंधित विभागाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आणि लाभार्थ्यांना निधी नेमका कधी मिळणार याबाबत माहिती द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

योजनेचा लाभ वेळेत मिळाला तर अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळू शकतो. मात्र सध्याच्या विलंबामुळे लाभार्थ्यांची शासकीय कार्यालयांमध्ये धावपळ सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2