KEM रुग्णालयातील बंद MRI मशीनची आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्याकडून पाहणी; सेवा लवकरच सुरू करण्याचे आदेश

मुंबईतील KEM रुग्णालयातील MRI मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. MRI सेवा सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश देतानाच अवयवदानाबाबत आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणाचीही गंभीर दखल घेतली.

Jun 12, 2026 - 22:05
 0  11
KEM रुग्णालयातील बंद MRI मशीनची आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्याकडून पाहणी; सेवा लवकरच सुरू करण्याचे आदेश
KEM रुग्णालयातील बंद MRI मशीनची आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्याकडून पाहणी

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. 12 : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी आज परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (KEM) रुग्णालयाला भेट देत रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरिश पाठक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून KEM रुग्णालयातील MRI मशीन बंद असल्याने अनेक रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

पाहणीदरम्यान MRI मशीनच्या देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचा व्यापक देखभाल करार (CMC) संपल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेतली असता, जर्मनीहून आवश्यक सुटे भाग मागविण्यात आले असून येत्या सोमवारपासून MRI सेवा पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी भांदिर्गे यांनी रुग्णालयातील विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच विविध प्रशासकीय फाईल्स आणि रखडलेल्या कामांबाबत स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

यासंदर्भात बोलताना हरिष भांदिर्गे म्हणाले, "सर्वसामान्य आणि गरजू नागरिक उपचारासाठी पालिका रुग्णालयांवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे."

दरम्यान, अवयवदानासारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयाची खिल्ली उडविणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या कथित प्रकरणाचीही त्यांनी गंभीर दखल घेतली. शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून अवयवदानाबाबत जनजागृती केली जात असताना वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे वर्तन होणे खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भांदिर्गे यांनी मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, रुग्णसेवा आणि महानगरपालिका रुग्णालयांमधील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0