आंतरराष्ट्रीय कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत मानपत्र देऊन गौरव
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १५ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या महापालिकेच्या धोरणांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सन्मान स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगत त्यांनी अशा सन्मानामुळे कलाकारांना नवसंजीवनी मिळते आणि युवा पिढीला कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनेक गुणी कलाकार विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. मात्र अनेकदा त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळत नाही. अशा कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा गौरव करण्याचे महापालिकेचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, शत्रुघ्न काटे, योगेश बहल, नगरसचिव मुकेश कोळप, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
मनोगतात डॉ. कपोते यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, त्यांचे संपूर्ण बालपण पिंपरी चिंचवडमध्ये गेले असून येथील शाळांमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांच्यामध्ये कलेची आवड निर्माण झाली. विशेषतः कथक नृत्यकलेबद्दलचे आकर्षण लहानपणापासूनच होते. ज्या शहरात बालपण गेले आणि जिथून कलात्मक प्रवासाला सुरुवात झाली, त्याच शहराकडून मिळालेला हा सन्मान अत्यंत अभिमानास्पद आणि भावनिक क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याचा उपक्रम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0