रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यापाऱ्याला ६३४ ग्रॅम सोने व रोख रक्कम परत
नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या छत्तीसगडमधील व्यापाऱ्याची रिक्षात विसरलेली ६३४ ग्रॅम सोने आणि ४३ हजार रुपये रोख असलेली बॅग प्रामाणिक रिक्षाचालक आणि सरकारवाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे सुरक्षितपणे परत मिळाली. या घटनेमुळे रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक होत आहे.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. १३ जून : नाशिकमध्ये एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे छत्तीसगडमधील व्यापाऱ्याला लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम असलेली बॅग सुरक्षितपणे परत मिळाली. या घटनेमुळे रिक्षाचालक आणि नाशिक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रायपूर (छत्तीसगड) येथील सोने-चांदीचे व्यापारी प्रवीण संपतलाल सोनी (वय ४३) हे आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी नाशिक येथे आले होते. शहरातील वाहतूक आणि रस्त्यांची माहिती नसल्याने त्यांनी आपली चारचाकी गाडी एका ठिकाणी पार्क करून रिक्षाने रामकुंड गाठले.
रामकुंड येथे स्नान केल्यानंतर त्यांना आपण सोबत आणलेली महत्त्वाची बॅग रिक्षामध्येच विसरल्याचे लक्षात आले. बॅगेत मोठ्या प्रमाणात सोने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
दरम्यान, संबंधित रिक्षाचालक देविदास शिवदास देशमुख (वय ६०) यांना रिक्षामध्ये बेवारस बॅग आढळली. प्रामाणिकपणा दाखवत त्यांनी ती थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा केली.
पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपड्यांसह ४३ हजार रुपये रोख रक्कम आणि ६३४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या लगड्या तसेच त्यासंबंधित पावत्या आढळून आल्या. पावत्यांवरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो यशस्वी झाला नाही.
यानंतर सरकारवाडा पोलिसांनी आयुक्तालयातील विविध व्हॉट्सॲप समूहांवर हरवलेल्या बॅगेबाबत माहिती प्रसारित करून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला.
दरम्यान, बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी प्रवीण सोनी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथून त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करून मालकीची खात्री पटवल्यानंतर सोन्याच्या लगड्या, रोख रक्कम आणि इतर साहित्यांसह संपूर्ण बॅग त्यांच्या ताब्यात दिली.
यावेळी प्रवीण सोनी यांनी मुंबईतील कारागिराकडे दागिने तयार करण्यासाठी हे सोने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. एवढ्या मौल्यवान वस्तू कमी वेळात आणि सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्यांनी रिक्षाचालक देविदास देशमुख आणि नाशिक पोलिसांचे मनापासून आभार मानले.
या संपूर्ण कारवाईत पोलीस हवालदार चंदर दळवी, पोलीस अंमलदार संदीप उघडे आणि महिला पोलीस अंमलदार आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे हरवलेली बॅग अल्पावधीत मालकापर्यंत पोहोचविणे शक्य झाले.
नाशिकमध्ये घडलेली ही घटना प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण ठरत असून नागरिकांकडून रिक्षाचालक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1