समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; मेहकरजवळ बसची ट्रकला धडक, 25 प्रवासी जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुणे-नागपूर मार्गावरील खासगी प्रवासी बसची ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून 11 जणांची प्रकृती गंभीर आहे.

Jun 8, 2026 - 18:28
 0  36
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; मेहकरजवळ बसची ट्रकला धडक, 25 प्रवासी जखमी
मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 25 प्रवासी जखमी, 11 गंभीर

बुलढाणा | प्रतिनिधी - महेंद्र मिश्रा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पिंपरी माळी गावाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला. पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आज पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात होती. यावेळी बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस समोरील ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. इतर जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची तीव्रता एवढी होती की अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी आणि बचाव पथकांनी तत्परता दाखवत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0