महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक का? साध्वी त्रिकाल भवंता यांचा प्रशासनाला सवाल; पोलिसांविरोधात कारवाईची मागणी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीदरम्यान ध्वज शिलान्यास पूजन सोहळ्यास उपस्थित राहण्यापासून पोलिसांनी रोखल्याचा आरोप करत महिला आखाड्याच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांनी संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. महिला आखाड्यांना कुंभमेळ्यात योग्य स्थान दिले जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

Jun 14, 2026 - 18:06
 0  3
महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक का? साध्वी त्रिकाल भवंता यांचा प्रशासनाला सवाल; पोलिसांविरोधात कारवाईची मागणी
साध्वी त्रिकाल भवंता, महिला आखाडा, सिंहस्थ कुंभमेळा

नाशिक ब्यूरो 

नाशिक, दि. १३ जून : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर महिला आखाडा आणि प्रशासन यांच्यातील वाद समोर आला आहे. सिंहस्थ ध्वज शिलान्यास पूजन सोहळ्याच्या वेळी पोलिसांनी महिला आखाड्याच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना साध्वी त्रिकाल भवंता म्हणाल्या की, कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखत पोलिसांनी त्यांना बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवले. या प्रकारामुळे महिला आखाड्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आली असून त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचा आरोप त्यांनी केला.

या संदर्भात त्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांना निवेदन देणार असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला आखाड्यांना दुय्यम स्थान?

साध्वी त्रिकाल भवंता यांनी कुंभमेळ्यात महिला आखाड्यांच्या सहभागाबाबतही प्रश्न उपस्थित केले. देशात महिलांना विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची संधी मिळत असताना सनातन धर्मातील आणि कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक आयोजनांमध्ये महिला आखाड्यांना पुरेसे प्रतिनिधित्व का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"संसदेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबाबत चर्चा होते, महिलांचे नेतृत्व सर्व क्षेत्रांत वाढत आहे. मात्र कुंभमेळ्यासारख्या सर्वोच्च धार्मिक सोहळ्यात महिला संतांना अडथळे का निर्माण केले जात आहेत?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘वेगळी भूमिका घ्यावी लागेल’

महिला आखाड्यांना कुंभमेळ्यात योग्य स्थान आणि सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत साध्वी भवंता यांनी इशारा दिला की, जर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन प्रक्रियेत महिला आखाड्यांचा विचारच केला जाणार नसेल तर त्यांना स्वतंत्र भूमिका घ्यावी लागू शकते.

त्या म्हणाल्या, "आजपर्यंतच्या अनुभवावरून महिला आखाड्यांना कुंभमेळ्यात योग्य स्थान दिले जात नसल्याचे दिसून आले आहे. आम्हाला महत्त्व नसेल तर आम्ही या सिंहस्थ पर्वात सहभागी व्हावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे."

प्रशासनावर सहकार्य न केल्याचा आरोप

प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महिला आखाड्यांच्या विविध मागण्या आणि सहभागाबाबत प्रशासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याचे सांगत, जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.

या प्रकरणामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान महिला आखाड्यांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे धार्मिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0