पंतप्रधान मोदींच्या 4,399 दिवसांच्या कार्यकाळाने महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सलग 4,399 दिवस नेतृत्व करत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सिंचन, पायाभूत सुविधा, मेट्रो, विमानतळ आणि बंदर प्रकल्पांना गती मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 4,399 दिवसांची सेवा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन केले आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाच्या विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली असून महाराष्ट्रालाही विकासाची नवी दिशा मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीचा गौरव केला. ते म्हणाले की, हा कालावधी केवळ आकडेवारी नसून भारताच्या सर्वांगीण प्रगतीचे महत्त्वपूर्ण पर्व आहे.
पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व विकास
मुख्यमंत्री म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, द्रुतगती महामार्ग आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे व्यापक जाळे उभारण्यात आले आहे. भारताने आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती करत जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांमध्ये स्थान निर्माण केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन प्रकल्पांना चालना, जलसंधारणासाठी मोठी गुंतवणूक तसेच कृषी विकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. "आत्मनिर्भर भारत" संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संरक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये मोठे बदल घडवून आणल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राला केंद्राचे भरीव सहकार्य
फडणवीस म्हणाले की, गेल्या बारा वर्षांत महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मोठा पाठिंबा मिळाला. वाढवण बंदर, विविध सिंचन प्रकल्प, मेट्रो नेटवर्क, रेल्वे आधुनिकीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महामार्ग प्रकल्प यामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे.
२०१५ च्या दुष्काळी परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले. 'जलयुक्त शिवार'सारख्या योजनांना बळ देण्यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रलंबित धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठीही सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.
56 लाख शेतकऱ्यांसाठी 36 हजार कोटींची कर्जमाफी
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबतही माहिती दिली. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची संपूर्ण माफी केली जाणार असून, कर्ज कोणत्या वर्षी घेतले याचा विचार केला जाणार नाही. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये मर्यादित अटी लागू असल्या तरी 99 टक्के शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
राज्यातील खतसाठ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक परिस्थिती लक्षात घेता काही नियमनात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पुरेसा खतसाठा उपलब्ध असून कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी काही अटी व निकष लागू करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी खतांच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याचे कारण नसून आवश्यक प्रमाणात खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक
"विकास भी और विरासत भी" या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा समतोल साधण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली असून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

