पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची तिसरी फेरी सुरू; युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १८ ते २५ वयोगटातील युवकांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपयांचे विद्यावेतनही दिले जाणार आहे.
कोल्हापूर, दि. ४ : देशातील युवकांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे सध्या कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना राबविण्यात येत असून, त्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
या योजनेद्वारे युवकांना देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा ९ हजार रुपयांचे विद्यावेतनही मिळणार आहे.
दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर पात्रता असलेल्या उमेदवारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुकांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून स्वतःचे प्रोफाइल तयार करावे आणि विविध क्षेत्रांतील उपलब्ध इंटर्नशिपसाठी अर्ज करावा.
जुबलीकंट फूड वर्क्स लिमिटेडमधील ऑपरेशन्स मॅनेजमेंट इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडसाठी १८ जून, तर हवेल्स इंडिया लिमिटेडसाठी २७ जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय विविध क्षेत्रांतील अनेक कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपसाठीही युवकांना अर्ज करता येणार आहे.
योजनेअंतर्गत उमेदवारांना अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भारत सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच संबंधित कंपन्यांकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
युवकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली कौशल्ये विकसित करावीत आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूरचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1

