कोल्हापुरात इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; राज्यभरातील कॅडेट्सचा सहभाग

कोल्हापूर येथे एनसीसी ग्रुप मुख्यालयाच्या वतीने इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC)-2026 ला उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील विविध एनसीसी ग्रुप मुख्यालयांतील कॅडेट्स नेमबाजी कौशल्याचे प्रदर्शन करत स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

May 27, 2026 - 20:58
 0  3
कोल्हापुरात इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; राज्यभरातील कॅडेट्सचा सहभाग
एनसीसी स्पर्धा, स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा, IGSSC 2026,

कोल्हापूर | प्रतिनिधी

एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आणि एनसीसी डायरेक्टरेट महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC)-2026 ला कोल्हापुरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा २७ ते २९ मे २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर येथील शूटिंग रेंजवर आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध एनसीसी ग्रुप मुख्यालयांतील गुणवंत एनसीसी कॅडेट नेमबाज सहभागी झाले असून राज्यस्तरीय पातळीवर नेमबाजी कौशल्याची चुरस पाहायला मिळत आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, म्हणजे २७ मे रोजी, महाराष्ट्रातील सर्व एनसीसी ग्रुप मुख्यालयांच्या संघातील प्रत्येकी पाच मुलांच्या संघाने उत्साहात सहभाग नोंदविला. प्रत्येक एनसीसी कॅडेटने ०.२२ स्पोर्ट्स शूटिंग रायफलमधून ४६ राऊंड्स फायर करत आपले नेमबाजी कौशल्य, एकाग्रता आणि शिस्त यांचे प्रभावी प्रदर्शन केले.

एनसीसी कॅडेट्समध्ये नेमबाजी क्रीडेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम नेमबाज तयार करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.

२८ मे रोजी मुलींच्या संघांची स्पर्धा

गुरुवार, २८ मे २०२६ रोजी, महाराष्ट्रातील प्रत्येक एनसीसी ग्रुप मुख्यालयाच्या संघातील पाच मुली एनसीसी कॅडेट्स या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. मुलींच्या गटातील स्पर्धाही तितकीच रंगतदार होणार असल्याची अपेक्षा आहे.

२९ मे रोजी पारितोषिक वितरण

स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ २९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्स आणि विजेत्या संघांचा गौरव करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, ग्रुप कमांडर, एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एनसीसी अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये आणि क्रीडा व युवक सेवा विभाग, कोल्हापूरचे उपसंचालक सुहास पाटील यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडत आहे.

या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील एनसीसी कॅडेट्समध्ये शिस्त, क्रीडाभावना आणि नेमबाजीतील प्राविण्य वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0