सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती द्या; पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर व इचलकरंजीतील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर-इचलकरंजीतील सीईटीपी प्रकल्पांच्या क्षमतेचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश; घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावी नियोजन करण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. ३ (जिमाका) : पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नदी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात सीईटीपी (CETP) यांच्या कामांना गती द्यावी. मंजूर प्रकल्प, यांत्रिकीकरण तसेच प्रकल्पांना जोडणाऱ्या पाइपलाइनची कामे समांतरपणे सुरू ठेवावीत, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
कोल्हापूर व इचलकरंजी परिसरातील प्रदूषित क्षेत्रांमध्ये कार्यरत आणि प्रस्तावित सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा योग्य पुनर्वापर याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामकाजाचाही मुंबई येथे लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगितले.
पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रकल्पांना गती
पंचगंगा नदीमध्ये शहरांमधून, ग्रामपंचायत क्षेत्रातून तसेच औद्योगिक क्षेत्रातून जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. मंजूर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच त्यांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
सीईटीपी प्रकल्पांची यांत्रिकीकरणाची कामे आणि त्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनची कामे एकाच वेळी सुरू ठेवावीत, जेणेकरून प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सांडपाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता तपासा
कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेची पाहणी करून त्यांची प्रत्यक्ष क्षमता, वापर, कार्यक्षमता आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे पूर्ववापर करता येतो का, याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरण रक्षण ही सामूहिक जबाबदारी
“पर्यावरण रक्षणाची जबाबदारी केवळ पर्यावरण विभागाची नसून ती प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. भविष्यात निर्माण होणारे पर्यावरणीय धोके नागरिकांनी ओळखून आतापासूनच जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच छोट्या गावांनीही त्यांच्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून पर्यावरणपूरक प्लॅन तयार करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकसंख्येच्या निकषावर घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन
प्रत्येक गावाची लोकसंख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.
आमदार राहुल आवाडे यांनी पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, तसेच इचलकरंजी महानगरपालिकेला जीएसटीमधील फरकाची रक्कम मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हा परिषदेकडून ४१ कोटींची कामे सुरू
सध्या जिल्हा परिषदेकडून सुमारे ४१ कोटी रुपयांची कामे सुरू असून, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केली.
कोल्हापूर व इचलकरंजीतील प्रकल्पांचे सादरीकरण
महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी अनुक्रमे कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी प्रदूषणाची स्थिती तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
मंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूर, इचलकरंजी शहर, नदी परिसरातील ग्रामपंचायती तसेच औद्योगिक क्षेत्रातून पंचगंगा नदीत जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सविस्तर आढावा घेतला.
अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित
बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोक माने, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आदी उपस्थित होते.
तसेच जल अभियंता हर्षदीप घाडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर वाघ्रांबरे यांच्यासह प्रदूषण नियंत्रण, एमआयडीसी आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी समन्वित प्रयत्नांची गरज
पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, त्यांची पूर्ण क्षमता वापरणे, पाइपलाइन जोडणी, यांत्रिकीकरण, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि स्थानिक पातळीवरील घनकचरा व्यवस्थापन या सर्व बाबी एकत्रितपणे राबविणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0