क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास सुरुवात; कोल्हापूरमध्ये FFFS प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या FFFS पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास सुरुवात झाली आहे. प्रकल्पाच्या पहिल्याच दिवशी १,३१९ खत बुकिंगसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आले असून शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कोल्हापूर, दि. ६ जून : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFFS) या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून शेतकऱ्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रकल्पाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे ५ जून रोजी, कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ३१९ खत बुकिंगसाठी क्यूआर कोड निर्माण करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला.
करवीर तालुक्यातील कोगे येथील मोरे ॲग्रो सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट्स येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांच्या हस्ते क्यूआर कोड स्कॅन करून शेतकरी उमाजी महादेव निकम आणि मारुती दत्तात्रेय घराळ यांना अनुदानित खतांचे वितरण करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण डिजिटल प्रणालीची पाहणी केली.
कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) सतीश देशमुख यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सरपंच वंदना इंगवले, उपसरपंच कृष्णनाथ फडतारे, पोलीस पाटील दत्तात्रय मिटारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
FFFS प्रणालीमध्ये ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) आणि आयएफएमएस खत वितरण प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. शेतकरी मोबाईल ॲपच्या माध्यमातून खत बुकिंग करून क्यूआर कोड प्राप्त करतात. त्यानंतर खत विक्रेत्याकडे हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर बुक केलेल्या प्रमाणानुसार खतांचे वितरण केले जाते.
या डिजिटल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. खत उपलब्धता, विक्रेत्यांची निवड, बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार असून प्रत्येक अनुदानित खताच्या गोणीची नोंद प्रणालीमध्ये राहणार आहे. त्यामुळे खतांचे समन्यायी वितरण सुनिश्चित होण्यास आणि गैरवापराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी, खत विक्रेते आणि कृषी विभाग यांच्या समन्वयातून या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून शेतकऱ्यांनी या आधुनिक सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी केले आहे.
कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असून भविष्यात खत वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि कार्यक्षमता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

