विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षणासह मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबईतील भायखळा येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित शाळा प्रवेशोत्सवात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ, योग आणि संगीताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मध्यान्ह भोजनाचे वितरणही करण्यात आले.
मुंबई प्रतिनिधी देवानंद शिंदे
मुंबई, दि. 15 : शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे, संस्कार संवर्धनाचे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून शिक्षण घेतानाच मैदानी खेळ, योग आणि संगीत यांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव तसेच राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.
राज्यपालांनी नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रथमच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करताना त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, जिज्ञासू वृत्ती विकसित करण्याचे आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार व कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या ‘विकसित भारत 2047’ या ध्येयपूर्तीत आजच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कार यांना अधिक बळकटी देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये संगीत आणि योग शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संगीतामुळे सर्जनशीलता आणि संवेदनशीलता वाढते, तर योगामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. मोबाईल फोनवर अधिक वेळ घालविण्याऐवजी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. खेळामुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांनी आजच्या युगात कौशल्य विकास, बहुभाषिक शिक्षण, क्रीडा आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि आत्मनिर्भर बनविणारे शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महानगरपालिका शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. महानगरपालिका शाळांमध्ये उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य मंडळासोबतच सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमांचे शिक्षणही महानगरपालिका शाळांमध्ये उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. बदलत्या काळात महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी शाळेतील प्रवेश प्रक्रियेचे अवलोकन केले. तसेच खगोलशास्त्र प्रयोगशाळा, पूर्व-प्राथमिक वर्ग, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि एफएलएन प्रयोगशाळेची पाहणी केली. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच मध्यान्ह भोजनाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0