मुंबई महानगरपालिका रुग्णालयांतील NICU सेवा अधिक सक्षम होणार; नवजात शिशूंच्या आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील नवजात शिशूंना अधिक आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी NICU व्यवस्थापन, CSR उपक्रम आणि डिजिटल डॅशबोर्ड प्रणालीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या उपस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध सुधारणा उपायांवर चर्चा केली.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. 11 जून 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील नवजात शिशूंना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी NICU (Neonatal Intensive Care Unit) व्यवस्थापन, CSR उपक्रम आणि ऑनलाईन डॅशबोर्ड प्रणाली या विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमधील NICU सुविधांचे सक्षमीकरण, नवजात शिशूंना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता वाढविणे आणि आवश्यक संसाधने निर्माण करण्यावर भर देण्यात आला. तसेच रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्डच्या प्रभावी वापरावरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीस सेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हरिष पाठक, लो. टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. छाया शिंदे, तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, विविध रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी आणि बालरोग व नवजात शिशुरोग क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील तज्ज्ञांनी नवजात शिशूंच्या आरोग्यसेवेमधील सध्याच्या आव्हानांवर प्रकाश टाकला. गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, उपचार पद्धती आणि डिजिटल व्यवस्थापन यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.
नवजात शिशूंच्या मृत्यूदरात घट करणे, उपचारांची गुणवत्ता वाढविणे आणि महानगरपालिका रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम बनविणे या दृष्टीने अशा समन्वयात्मक बैठका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक आधुनिक, सक्षम आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, नवजात शिशूंना सर्वोत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0