नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीसाठी 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था साकारणार

महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. 250 एकर परिसरात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक होणार असून 10 हजारांहून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

Jun 11, 2026 - 21:10
 0  11
नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीसाठी 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था साकारणार
नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी, देवेंद्र फडणवीस,

क्लीव्हलँड (ओहायो), दि. 10 : महाराष्ट्रात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांचे एकात्मिक केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (NMIMC) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे 10 हजार कोटी रुपयांहून अधिक) गुंतवणूक होणार असून 10 हजारांपेक्षा अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, "मेडिसिटी ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाची प्रतिभा एका ठिकाणी आणणारी आरोग्यसेवा परिसंस्था आहे. ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘Heal in India’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे.

250 एकरांवर उभारली जाणार मेडिसिटी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. भारतातील पहिले जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून या मेडिसिटीची संकल्पना करण्यात आली आहे.

क्लीव्हलँड क्लिनिकची महत्त्वाची भूमिका

या प्रकल्पात जगप्रसिद्ध क्लीव्हलँड क्लिनिक प्रमुख भागीदार म्हणून कार्य करणार आहे. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील त्यांचा जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे.

क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टॉम मिहाल्जेविक यांनी सांगितले की, भारतात क्लिनिकल उत्कृष्टता, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आरोग्यसेवेचे एकात्मिक केंद्र

मेडिसिटीमध्ये खालील सुविधा विकसित करण्यात येणार आहेत:

जागतिक दर्जाची बहुविशेषता रुग्णालये

वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था

क्लिनिकल संशोधन केंद्रे

जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आरोग्यसेवा नवोन्मेष केंद्र

वेलनेस आणि पुनर्वसन सुविधा

वैद्यकीय पर्यटनासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा

संशोधन आणि नवोन्मेषाला चालना

मेडिसिटीभोवती उभारल्या जाणाऱ्या नवोन्मेष परिसंस्थेत एलएनएमआयआयटी, जयपूर देखील सहभागी होणार आहे. संस्थेकडून संशोधन पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि शैक्षणिक कौशल्य उपलब्ध करून देण्यात येणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रिसिजन मेडिसिन आणि ट्रान्सलेशनल रिसर्च क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळणार आहे.

महाराष्ट्राला जागतिक आरोग्य केंद्राची ओळख

ब्रुकफिल्डचे व्यवस्थापकीय भागीदार अंकुर गुप्ता यांनी हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर आरोधन हेल्थ सिटीच्या संस्थापक डॉ. सलोनी पटवर्धन यांनी नवी मुंबईला जागतिक आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र शासन या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सहकार्य करणार असून विविध मंजुरी आणि परवानग्या मिळवून देण्यासाठीही मदत करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1