राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; भंडारा व रायगडच्या ग्रामपंचायतींना देशात प्रथम क्रमांक

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत देशपातळीवर आपली छाप उमटवली. भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) आणि रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतींनी अनुक्रमे ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावत प्रत्येकी १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले.

Jun 4, 2026 - 19:40
 0  4
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; भंडारा व रायगडच्या ग्रामपंचायतींना देशात प्रथम क्रमांक
नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ वितरण सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी.

बालस्नेही आणि जलसमृद्ध पंचायत श्रेणीत महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर दबदबा

नवी दिल्ली, दि. ३ : शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘जलसमृद्ध पंचायत’ या प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यातील अनेक ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह), केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि आसाम सरकारचे मंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या नऊ प्रमुख निकषांवर आधारित मूल्यांकनानंतर देशभरातील उत्कृष्ट पंचायतांची निवड करण्यात आली. पंचायत प्रगती निर्देशांकाच्या आधारे एकूण ४२ पंचायतांना राष्ट्रीय सन्मान देण्यात आला.

भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावत १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आणि बालहिताच्या विविध उपक्रमांसाठी या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील खारीवली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि पाण्याच्या प्रभावी वापरासाठी राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांमुळे खारीवलीला हा मान मिळाला.

नाशिक जिल्ह्यातील निंबळे (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने ‘सुशासन पंचायत’ श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. तर रायगड जिल्ह्यातील चांभारली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळवत ३७.५ लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला.

यावेळी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कार्याचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या विशेष ई-पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच देशभरातील पंचायत राज संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘बेस्ट प्रॅक्टिसेस कॉम्पेंडियम’चे प्रकाशन करण्यात आले. काही निवडक पंचायतांच्या यशस्वी उपक्रमांवर आधारित माहितीपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.

विशेष सत्रांमध्ये पुरस्कारप्राप्त पंचायत प्रतिनिधींनी आपले अनुभव, यशोगाथा आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचे सादरीकरण केले. यामुळे देशभरातील इतर ग्रामपंचायतींना विकासाच्या नव्या दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, अवर सचिव सुशील कुमार लोहानी, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच देशभरातील पंचायत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधील या यशामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या विकासाभिमुख, लोकसहभागावर आधारित आणि शाश्वत उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून ग्रामीण विकास क्षेत्रातील राज्याच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळाले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.