‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रितेश-जिनिलिया देशमुख यांचे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दर्शन
राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दर्शन घेऊन विशेष प्रार्थना केली. चाहत्यांनी त्यांचे पारंपरिक स्वागत केले.
भिवंडी : प्रतिनिधी
‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते रितेश देशमुख तसेच अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) येथे दर्शन घेत विशेष प्रार्थना केली.
महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि शिवचरित्राशी नाते सांगणाऱ्या या चित्रपटाच्या यशासाठी या स्टार जोडप्याने पारंपरिक पद्धतीने आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
भक्तिमय आणि उत्साही वातावरण
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील मंदिरात त्यांच्या आगमनाने भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले. मंदिर परिसरात उपस्थित भाविक, गावकरी आणि चाहत्यांनी या लोकप्रिय जोडप्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.
दर्शनावेळी रितेश आणि जिनिलिया यांनी अत्यंत साधेपणाने पूजा-अर्चा केली.
चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना
‘राजा शिवाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभावे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचा संदेश घराघरात पोहोचावा, अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी केली.
पारंपरिक आरतीनंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या प्रेम, शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ढोल-ताशात पारंपरिक स्वागत
या विशेष भेटीची माहिती समजताच परिसरातील मोठ्या संख्येने महिला, युवक, गावकरी आणि चाहत्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
नववारी साड्या परिधान केलेल्या महिलांनी सांस्कृतिक अभिमान जपत स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला आणि वातावरणाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
‘राजा शिवाजी’ थीमवरील रांगोळी आकर्षण
चाहत्यांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या थीमवर आकर्षक रांगोळी साकारून चित्रपटाबद्दलचा उत्साह आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना व्यक्त केली. ही रांगोळी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.
१ मे रोजी चित्रपट प्रदर्शित
‘राजा शिवाजी’ हा केवळ चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा, स्वराज्याच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा भव्य सिनेमॅटिक प्रवास असल्याचे मानले जात आहे.
हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणार आहे.
श्रद्धा, इतिहास आणि चाहत्यांचे प्रेम
रितेश-जिनिलिया देशमुख यांची ही मंदिर भेट श्रद्धा, संस्कृती, इतिहास आणि चाहत्यांच्या प्रेमाचा सुंदर संगम ठरली. स्थानिकांचे उत्स्फूर्त स्वागत आणि भक्तिमय वातावरणामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0