अंगणवाडी आहार दरवाढ आणि कर्मचारी निवृत्ती वयवाढीसंदर्भात शासन सकारात्मक – मंत्री आदिती तटकरे

अंगणवाडी बालकांसाठी गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहार दरवाढीबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अंगणवाडी सेविकांच्या निवृत्ती वयवाढ, थकीत मानधन, भाडेवाढ आणि वाय-फाय सुविधांसंदर्भातही शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

May 30, 2026 - 03:22
 0  6
अंगणवाडी आहार दरवाढ आणि कर्मचारी निवृत्ती वयवाढीसंदर्भात शासन सकारात्मक – मंत्री आदिती तटकरे
अंगणवाडी, आदिती तटकरे, अंगणवाडी सेविका, आहार दरवाढ,

मुंबई, दि. २९ : अंगणवाडी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहार दरवाढीबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसेच अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट नियुक्तीने अंगणवाडी सेविका पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याबाबतही शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि.रा. ठाकूर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे विजय क्षीरसागर, भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष शुभा शमीम उपस्थित होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, बालकांना अधिक उत्कृष्ट आणि पोषणमूल्ययुक्त आहार मिळावा यासाठी आहार दरवाढीचा प्रस्ताव प्रक्रियेत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅज्युएटी) संदर्भात शासन सकारात्मक असून विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच प्रोत्साहन भत्ता आणि केंद्र शासनाकडील थकीत मानधन तातडीने अदा करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांच्या भाडेवाढीसंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणी कमी करण्यासाठी केंद्रांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही शासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत अंगणवाडी कर्मचारी व सेविकांच्या इतर विविध मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. शासन अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1