आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ पुस्तकाचे नवी दिल्लीत प्रकाशन
खते, रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ या पुस्तकाचे नवी दिल्लीत प्रकाशन करण्यात आले. नेतृत्वगुण, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, व्यावसायिक नीतिमत्ता आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित हे पुस्तक व्यवस्थापन क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
नवी दिल्ली, दि. २९ मे : खते, रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ तसेच व्यवस्थापन अभ्यासक आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ या पुस्तकाचे प्रकाशन हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्या डॉ. सुमेधा कटारिया यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे संपन्न झाले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक श्री. हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त श्री. नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे तसेच श्रीमती मालती राजगोपालन उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनानंतर लेखक आर. जी. राजन यांनी उपस्थितांशी संवाद साधत आपल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवांवर प्रकाश टाकला. खते, रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील ४५ वर्षांहून अधिक काळाच्या समृद्ध अनुभवातून त्यांनी व्यवस्थापनातील विविध महत्त्वपूर्ण पैलूंवर मार्गदर्शन केले.
‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ या पुस्तकामध्ये नेतृत्वगुण, कॉर्पोरेट गव्हर्नन्स (संस्थात्मक सुशासन), व्यावसायिक नीतिमत्ता आणि शाश्वत विकास या विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. संस्थेचे यश केवळ आर्थिक किंवा तांत्रिक प्रगतीवर अवलंबून नसून उत्तम चारित्र्य, कामातील सचोटी आणि लोककेंद्री नेतृत्व हे दीर्घकालीन यशाचे खरे सूत्र असल्याचे लेखक आर. जी. राजन यांनी यावेळी स्पष्ट केले.
व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक, विद्यार्थी तसेच नेतृत्व कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0