गगनबावडा येथे ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
कोल्हापूर जिल्यातील गगनबावडा येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने गगनबावडा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम २५ मे रोजी तहसील कार्यालय, गगनबावडा येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के, बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा वैशाली बुटाले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस. एन. दाते, संरक्षण अधिकारी नवीन गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमात तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांनी ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांची भूमिका, जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांबाबत मार्गदर्शन केले.
तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कांबळे यांनी बालकांची सुरक्षितता आणि संरक्षणाच्या दृष्टीने ग्राम बाल संरक्षण समितीची रचना आणि कार्यपद्धती या विषयावर सविस्तर माहिती दिली.
बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी समाजात मुलींच्या संदर्भात वाढत्या बालविवाहाच्या समस्येवर भाष्य
करत ‘बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६’ या कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याशिवाय अॅड. शिल्पा सुतार यांनी ‘बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२’ (POCSO Act) संदर्भात संवेदनशील बाबींवर माहिती देत बालकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदी समजावून सांगितल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस. एन. दाते यांनी केले, तर संरक्षण अधिकारी नवीन गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बाल संरक्षण विषयक जागरूकता वाढविणे, ग्रामस्तरावर बाल हक्क आणि सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या समित्यांची भूमिका अधिक प्रभावी करणे आणि बालविवाह तसेच बाल अत्याचार प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा उभारणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
