हिंगोलीत पावसामुळे हळद भिजली; संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन, बाजार समितीत लिलाव बंद
हिंगोलीत अचानक झालेल्या पावसामुळे बाजार समितीत साठवलेली हळद भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत लिलाव प्रक्रिया बंद पाडली.
हिंगोली प्रतिनिधी भगवानराव मस्के
दि. ६ मे २०२६ : “पिवळ्या सोन्याचा” जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली येथे हळद उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील प्रमुख खरेदी केंद्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
मंगळवारी झालेल्या अचानक पावसामुळे बाजार समिती परिसरात साठवून ठेवलेली हळद पूर्णपणे भिजली. त्यामुळे हळदीचा दर्जा खालावून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे नुकसान झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. “शेतकऱ्यांची हळद काळी झाली” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळे फासून निषेध नोंदवला.
यावेळी शेतकऱ्यांनी हळदीचे घसरलेले दर आणि खरेदी प्रक्रियेत होत असलेला विलंब यावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काही काळासाठी बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया बंद पाडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची हळद योग्य दराने खरेदी केली जाईल, खरेदी प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करत लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ दिली.
या आंदोलनात मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
What's Your Reaction?
Like
8
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
2

