पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम 31 मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 31 मे 2026 रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे करण्यात आले आहे. नृत्य, संगीत, अभिनय आणि दृश्यरचनांच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

May 30, 2026 - 22:25
 0  8
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम 31 मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,

मुंबई, दि. ३० : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रविवार, 31 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये करण्यात आले आहे.

भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग या कार्यक्रमातून साकारण्यात येणार आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाचा, स्त्रीशक्तीच्या नेतृत्वाचा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा प्रभावी आढावा या सांस्कृतिक सादरीकरणातून मांडण्यात येणार आहे.

नृत्य, संगीत, अभिनय आणि आकर्षक दृश्यरचनांच्या माध्यमातून प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनसंघर्षाचा, प्रशासन कौशल्याचा आणि जनकल्याणकारी कार्याचा अनुभव घेता येणार आहे. ऐतिहासिक आशय आणि कलात्मक सादरीकरण यांचा सुरेख संगम असलेला हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुप्रसिद्ध कलावंत शशीन मेस्त्री यांनी केले आहे. नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना आणि कलात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून अहिल्यादेवींचा वैभवशाली जीवनप्रवास रंगमंचावर जिवंत करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी इतिहासप्रेमी, विद्यार्थी, सांस्कृतिक रसिक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0