फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा

पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथे विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर महापौर रवि लांडगे, आमदार उमा खापरे आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून शहरातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

May 30, 2026 - 02:49
 0  7
फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा
फुगेवाडी विषारी दारू प्रकरण, पिंपरी चिंचवड

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २९ मे २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथील संजयनगर परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सक्रिय झाले असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. या प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे आणि विधान परिषद सदस्या आमदार उमा खापरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

महापौर रवि लांडगे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अवैध हातभट्टी व्यवसायामुळे निरपराध नागरिकांचे जीव जाणे ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायी बाब आहे. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपला असून त्यांच्या दुःखाची भरपाई कोणत्याही स्वरूपात होऊ शकत नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील सर्व अवैध व्यवसायांवर तातडीने प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर महापौर रवि लांडगे यांनी दापोडी पोलीस ठाण्यास भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. आरोपींना कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आमदार उमा खापरे यांनीही शहरातील अवैध हातभट्टी आणि तत्सम बेकायदेशीर धंदे तातडीने बंद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे सांगितले. अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाकडूनही संबंधित कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.

दुसरीकडे, खासदार श्रीरंग बारणे यांनीही दापोडी पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी शहरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

खासदार बारणे म्हणाले की, ही गावठी दारू हडपसर परिसरातील लमान तांडा येथे तयार करून विविध भागात पुरवली जात होती. केमिकलचे प्रमाण अधिक झाल्याने दारू विषारी ठरली आणि त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला. काही जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.

शहरात वाढत्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विशेष युनिट स्थापन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली असून अवैध हातभट्टी व्यवसायांविरोधात कठोर मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0