कमी खर्चात अधिक उत्पादनाचा मंत्र; कोरचीत सगुणा भात शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात कृषी विभागामार्फत सगुणा भात शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. कमी खर्च, पाण्याची बचत आणि अधिक उत्पादन देणाऱ्या या तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गडचिरोली : तालुका कृषी विभाग, कोरची यांच्या वतीने मौजा शिकारी टोला येथे ‘सगुणा भात लागवड तंत्रज्ञान’ (SRT) या आधुनिक शेती पद्धतीचे प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. पारंपरिक भात शेतीच्या तुलनेत कमी खर्च, कमी मजुरी आणि अधिक उत्पादन देणाऱ्या या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या उत्पादनात आणि आर्थिक उत्पन्नात वाढ करणे हा होता.
यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाचे फायदे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची पद्धत सविस्तरपणे समजावून सांगितली. या पद्धतीत पारंपरिक शेतीप्रमाणे नांगरणी आणि चिखलणी करण्याची आवश्यकता नसते. कायमस्वरूपी गादीवाफे तयार करून त्यावर टोकरण पद्धतीने भात लागवड केली जाते. त्यामुळे मशागत खर्चात मोठी बचत होते.
या तंत्रज्ञानामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो आणि पाण्याची जवळपास ५० टक्क्यांपर्यंत बचत होते. तसेच पिकांची मुळे खोलवर विकसित होत असल्याने झाडे मजबूत बनतात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. परिणामी उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ म्हणाले की, “सगुणा भात लागवड तंत्रज्ञान ही काळाची गरज असून या पद्धतीमुळे मशागत, डिझेल, मजुरी आणि वेळेच्या खर्चात ३० ते ४० टक्क्यांहून अधिक बचत होते. कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनवाढीसोबतच आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
प्रात्यक्षिकादरम्यान कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतात गादीवाफे तयार करण्याची पद्धत, टोकरण यंत्राचा वापर तसेच आंतरमशागतीची प्रक्रिया करून दाखवली. शिकारी टोला आणि परिसरातील गावांमधून आलेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमास प्रभारी मंडळ कृषी अधिकारी श्री. मसराम, गुण नियंत्रण अधिकारी श्री. पार्थोडे, बीटीएम श्री. टेंभुरे, कृषी सेवक श्री. डोंगरवार, गावचे सरपंच, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभागाच्या या उपक्रमाबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत यंदाच्या खरीप हंगामात सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0