रामसागर येथे संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात रामसागर येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांवर धाड टाकून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित अनधिकृत एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांची अवैध साठवणूक आणि विक्री होत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ३५ हजार ४३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१४ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून रामसागर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पुष्पा, बलवान आणि मालामाल या वाणांच्या संशयास्पद कापूस बियाण्यांची ३७ पाकिटे आढळून आली. तसेच बियाण्यांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे सीलिंग मशीन आणि कोरे पॅकेटही जप्त करण्यात आले.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची किंमत ३३ हजार ९३७ रुपये असून सीलिंग मशीनची अंदाजे किंमत १ हजार ५०० रुपये आहे.
या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार, रा. रामसागर यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) चेतन चलकलवार यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपीविरोधात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने केली. मोहिम अधिकारी आनंद पाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. बनसोडे आणि पोलीस अंमलदार राहुल रामटेके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे आणि तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

