२१ जून रोजी शेगावातून पंढरपूरकडे श्री संत गजानन महाराज पालखीचे प्रस्थान
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी २१ जून रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदा श्रींच्या पायदळ वारीचे ५७ वे वर्ष असून ७०० हून अधिक वारकरी यात सहभागी होणार आहेत.
शेगाव | अमोल सराफ, विदर्भ ब्युरो
विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. श्रींच्या पायदळ वारीचे हे ५७ वे वर्ष असून वारकरी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथे दाखल होणार असून २८ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपुरात राहणार आहे. या कालावधीत वारकरी आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी पायदळ वारीत सहभागी होणार असून ७०० पेक्षा अधिक पताकाधारी वारकरी या दिंडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. शेगाव ते पंढरपूर आणि परतीचा पंढरपूर ते शेगाव असा जवळपास ८०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास वारकरी पायी पूर्ण करतात.
श्री संत गजानन महाराज संस्थानच्या या पायदळ वारीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असून विदर्भासह राज्यभरातील भाविक मोठ्या श्रद्धेने या वारीत सहभागी होत असतात. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
