शेगाव नगरपरिषदेत स्वच्छता विभागावरून वाद; कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव

शेगाव नगरपरिषदेत स्वच्छता विभागाच्या कामकाजावरून झालेल्या वादामुळे वातावरण तापले. नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक आणि प्रभारी आरोग्य अभियंता यांच्याशी कथित अरेरावी व अवमानकारक भाषेत वाद घातल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत पोलिसांत तक्रार दाखल केली.

Jun 23, 2026 - 15:36
 0  2
शेगाव नगरपरिषदेत स्वच्छता विभागावरून वाद; कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव
शेगाव नगरपरिषदेत स्वच्छता विभागावरून वाद;

बुलढाणा प्रतिनिधी: महेंद्र मिश्रा 

शेगाव, दि. 22 : शेगाव नगरपरिषदेत स्वच्छतेच्या कामकाजावरून निर्माण झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत आपला निषेध नोंदविला.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक वैभव राठोड आणि प्रभारी आरोग्य अभियंता प्रमोद खराटे यांच्याशी नगरसेविकेचे चिरंजीव पियुष ओवे यांनी नगरपरिषद कार्यालयात येऊन कथितरित्या अरेरावीची व अवमानकारक भाषा वापरत वाद घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत थेट शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार आणि मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनाही निवेदन देण्यात आले.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, शासकीय कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी सन्मानपूर्वक वागणूक ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होत असून प्रशासनाच्या कामकाजात अडथळे निर्माण होतात.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपाचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मतदार आपल्या समस्या आणि विकासकामे मार्गी लागावीत या अपेक्षेने लोकप्रतिनिधींना निवडून देतात. मात्र काही ठिकाणी लोकप्रतिनिधींऐवजी त्यांच्या नातेवाईकांकडून कामकाजात हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असतात.

या प्रकरणी संबंधितांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0