सिंहगड रोडवरील पूरजन्य भागांची आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पाहणी; संरक्षण भिंत व पावसाळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सिंहगड रोडवरील एकता नगरी परिसरातील पूरजन्य भागांची पाहणी करून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संरक्षक भिंत, तात्पुरता बंधारा आणि पावसाळी लाईन सफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे, दि. २९ मे २०२६ : पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सिंहगड रोड परिसरातील एकता नगरी येथील पूरजन्य भागांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान सीमाभिंत तसेच इतर अनुषंगिक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः नाल्याच्या कडेला सुरू असलेले संरक्षक भिंतीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच नदीकाठी गतवर्षीप्रमाणे मातीचा तात्पुरता बंधारा उभारण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
या कामांसाठी क्षेत्रीय कार्यालय आणि प्रकल्प विभाग यांनी समन्वय साधून कामे वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी पावसाळी लाईनची सफाई संबंधित विभागाने पूर्ण करावी, जेणेकरून पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता पथ विभाग श्री. राजेश बनकर, मुख्य अभियंता प्रकल्प विभाग श्री. दिनकर गोजारे, मुख्य अभियंता पाणी पुरवठा विभाग श्री. नंदकिशोर जगताप, उपायुक्त दक्षता विभाग श्री. प्रसाद काटकर, मुख्य अभियंता विद्युत विभाग श्रीमती मनीषा शेकटकर, उपायुक्त परिमंडळ क्रमांक ३ श्री. विजयकुमार थोरात, उपायुक्त घनकचरा विभाग श्री. संतोष वारुळे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग श्री. तुषार बाबर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी पूरप्रतिबंधक उपाययोजना वेगाने राबवून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

