भेसळखोरांच्या नफेखोरीने समाजाला विषबाधा; युवकांच्या जीवाशी खेळ थांबला पाहिजे – आमदार सत्यजीत तांबे
पुण्यातील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी भेसळविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. अन्नपदार्थ, पेये आणि इतर उत्पादनांमधील भेसळ ही समाजाच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या असल्याचे सांगत त्यांनी नफेखोरीच्या प्रवृत्तीवर टीका केली. युवकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसोबत जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचीही गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नाशिक ब्यूरो
मुंबई, दि. ३० एप्रिल २०२६ : भेसळविरोधी कारवायांमध्ये प्रशासनाने अलीकडे घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे स्वागत करत आमदार सत्यजीत तांबे यांनी पुण्यातील विषारी दारू प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भेसळ हा केवळ एखाद्या उत्पादनापुरता मर्यादित विषय नसून तो संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अलीकडे राज्यभरात भेसळविरोधात राबविलेल्या धाडींचा उल्लेख करत तांबे म्हणाले की, भेसळीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरतेने मांडण्याची गरज आहे. विधान परिषदेत आपण अनेकदा स्टिंग पेय, भेसळयुक्त पनीर आणि इतर अन्नपदार्थांमधील भेसळीच्या मुद्द्यांवर आवाज उठवला असल्याचे त्यांनी सांगितले.
तांबे म्हणाले की, भारतात अन्नपदार्थांमधील भेसळ हा सर्वात कमी चिंतेचा विषय मानला जातो, मात्र प्रत्यक्षात तो सर्वाधिक चिंतेचा विषय असायला हवा. माणूस जगण्यासाठी अन्न ग्रहण करतो आणि त्यामुळे अन्नाची सुरक्षितता ही समाजाच्या अस्तित्वाशी संबंधित बाब आहे. तरीदेखील भेसळीच्या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भेसळयुक्त पनीर, संशयास्पद पेये किंवा विषारी दारू अशा सर्व घटनांच्या मुळाशी नफेखोरीची मानसिकता असल्याचे सांगत तांबे यांनी काही घटक नागरिकांच्या आरोग्याची आणि जीवाची पर्वा न करता अधिकाधिक नफा कमावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताकडे केवळ मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या घटनेत अनेक कुटुंबांनी आपले कर्ते सदस्य गमावले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नसून समाजाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवकांवर भेसळयुक्त पदार्थ आणि व्यसनाधीनतेचा सर्वाधिक परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत तांबे म्हणाले की, कठोर कायदेशीर कारवाईबरोबरच जनजागृती, शिक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देणे आवश्यक आहे. युवकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर आणि प्रभावी कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
भेसळ आणि नफेखोरीकडे समाजाने केलेले दुर्लक्षच अशा दुर्घटनांना कारणीभूत ठरत असल्याचे सांगत तांबे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0