जागतिक पर्यावरण दिनी ‘नाशिक वनराई’चा दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक वनराईचा दशकपूर्ती सोहळा म्हसरूळ येथील वनविभागाच्या डेपोमध्ये उत्साहात पार पडला. नागरिकांनी सेंद्रिय खत अर्पण करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
नाशिक ब्युरो : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ‘नाशिक वनराई’चा दशकपूर्ती सोहळा म्हसरूळजवळील वनविभागाच्या डेपो परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला निसर्गप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
‘आपलं पर्यावरण’ संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक घरून पाणी घेऊन आले. तसेच काही नागरिकांनी एक किलो ते पंचवीस किलोपर्यंत गांडूळ खत, कंपोस्ट खत, निम खत यांसह विविध प्रकारची सेंद्रिय खते आणून वनराईतील वृक्षांना अर्पण केली. या उपक्रमातून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
दहा वर्षांच्या कालावधीत नाशिक वनराईतील वृक्षांची झालेली भरघोस वाढ पाहून उपस्थित निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले. या वनराईने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास उपवनसंरक्षक (पश्चिम विभाग, नाशिक) सिद्धेश सावर्डेकर, सहायक उपवनसंरक्षक कल्पना वाघेरे, सहायक उपवनसंरक्षक प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. निकम यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी, ‘आपलं पर्यावरण’ संस्थेचे सदस्य आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
यावेळी नाशिक वनराईची देखभाल करणारे कुमार भोये आणि नाशिक देवराईची देखभाल करणारे भीमा डहाळे यांचा ‘आपलं पर्यावरण’ संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. दशकभराच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करत पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी अशीच सक्रिय भूमिका कायम ठेवावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
निसर्गसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे ‘नाशिक वनराई’ हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातील एक प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

