जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती सायकल राईड; तंबाखूमुक्त समाजाचा संदेश

जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नाशिक आणि नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन (NCF) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर सायकल राईडचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून नागरिकांना तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.

May 30, 2026 - 20:13
 0  7
जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती सायकल राईड; तंबाखूमुक्त समाजाचा संदेश
जागतिक तंबाखूमुक्त दिन, नाशिक, सायकल राईड

नाशिक, दि. ३१ मे : जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक आणि नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन (एनसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर सायकल राईडचे आयोजन करण्यात आले. तंबाखू आणि इतर व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज सकाळी ६.३० वाजता अनंत कान्हेरे मैदान येथून सायकल राईडला प्रारंभ झाला. पोलीस उपायुक्त श्री. चंद्रकांत गवळी, आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. विशाल पवार, उपाध्यक्ष डॉ. जोगेश बच्छाव, सचिव डॉ. पंकज भट्ट तसेच नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अमित नारायण घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राईडचा शुभारंभ करण्यात आला.

अनंत कान्हेरे मैदान येथून सुरू झालेली ही सायकल राईड शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शालीमार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयात समाप्त झाली. राईडदरम्यान सहभागी सायकलपटूंनी तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश देत नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.

सायकल राईडनंतर आयएमएच्या सभागृहात नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या सदस्यांनी तंबाखूमुक्ती आणि व्यसनमुक्ती या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात डॉ. मनिषा रौंदळ, साधना दुसाने, माधुरी गडाख, सीमा घुगे आणि मोहन देसाई यांनी सहभाग घेत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अमित नारायण घुगे तसेच पथनाट्य सादर करणाऱ्या टीमचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

यावेळी नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष दविंदर सिंग भेला, संचालक कारभारी भोर, सुरेश डोंगरे, शुभम भालेराव तसेच अनेक सायकलप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी अशा जनजागृती मोहिमा प्रभावी ठरत असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0