२५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’; लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री आशिष शेलार

राज्यात २५ जूनपासून सुरू होणाऱ्या ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत व्यसनमुक्ती, सार्वजनिक स्वच्छता, अमली पदार्थांवरील नियंत्रण, वाहतूक कोंडी आणि पर्यावरण संवर्धन यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

May 30, 2026 - 22:31
 0  4
२५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’; लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री आशिष शेलार
२५ जूनपासून ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान

मुंबई, दि. ३० मे २०२६ : राज्य शासनाच्या वतीने २५ जूनपासून सुरू होणाऱ्या ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आयोजित या बैठकीत सुमारे १६० मान्यवरांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला.

बैठकीस महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विविध लोकप्रतिनिधी तसेच पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच काही भागांमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि समाजातील विविध स्तरांवर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. या अभियानात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत किनारी भागांतील तिवरांच्या अनधिकृत तोडीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री शेलार यांनी दिले.

याशिवाय पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसंदर्भातही चर्चा झाली. वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षित, स्वच्छ, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक परिसर निर्माण करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सहभागातून प्रभावी कृती आराखडा राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0