बारा बंगला फिल्टरेशन प्लांटचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करा; आमदार देवयानी फरांदे यांचे आदेश Slug:
नाशिकमधील प्रभाग ७, १२ आणि १३ मधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या बारा बंगला फिल्टरेशन प्लांटच्या कामाची आमदार देवयानी फरांदे यांनी पाहणी केली. काम दिवस-रात्र सुरू ठेवून डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नाशिक ब्यूरो |
शहरातील प्रभाग क्रमांक ७, १२ आणि १३ मधील नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या बारा बंगला फिल्टरेशन प्लांटच्या कामाची आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
गंगापूर धरणातून पाणी आणून बारा बंगला येथे अत्याधुनिक फिल्टरेशन प्लांट उभारण्याचे नियोजन स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी सन २०२२ मध्ये कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही काम पूर्णत्वास जात नसल्याने परिसरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची प्रगती तपासली. यावेळी त्यांनी कामाची गती वाढवून दिवसा तसेच रात्रीदेखील काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.
“प्रभाग ७, १२ आणि १३ मधील नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेतील हा महत्त्वाचा प्रकल्प असूनही काम रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे कोणतीही सबब न सांगता काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,” असे आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. धारणकर यांनी पुढील तीन दिवस काम दिवस-रात्र सुरू ठेवण्यात येईल तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत फिल्टरेशन प्लांट पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक बबलू शेलार, शहर अभियंता अग्रवाल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता गणेश मैड, श्री. निकम, प्रकल्प अधिकारी आशिष सूर्यवंशी, नवीन पाटेकर तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सदर फिल्टरेशन प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर प्रभाग ७, १२ आणि १३ मधील हजारो नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
