श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरात अंध बांधवांचे पारायण सुरू; अध्यात्म आणि प्राकृत भाषेच्या ज्ञानासाठी अनोखा उपक्रम
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने अंध बांधवांसाठी विशेष पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राकृत भाषेचे ज्ञान, अध्यात्माची आवड आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात महाराष्ट्रभरातून ६० हून अधिक अंध प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
नाशिक ब्युरो | त्र्यंबकेश्वर
अंध बांधवांना प्राकृत भाषेचे ज्ञान मिळावे तसेच अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विशेष पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासानिमित्त हा उपक्रम शुक्रवार, दि. २२ मे २०२६ ते २४ मे २०२६ या कालावधीत जाईबाई धर्मशाळा, निवृत्तीनाथ मंदिराजवळ आयोजित करण्यात आला आहे.
या पारायणाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शिरसाठ, हरिभक्त परायण गणपत महाराज जगताप आणि आवाहन आखाडा व्यवस्थापक अंकित गुरु यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या पारायण कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून सुमारे ६० हून अधिक अंध प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य डोळस व्यक्तींप्रमाणे अंध बांधवांनाही अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन आणि पारायण करता यावे यासाठी या उपक्रमाची संकल्पना राबविण्यात आली आहे.
ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी सांगितले की, डोळस व्यक्ती ज्ञानेश्वरीचे पारायण सहजपणे करू शकतात. मात्र अंध व्यक्तींना ब्रेल लिपीद्वारे वाचन करावे लागत असल्याने त्यांना पारायणात सहभागी होण्यास अनेक अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन संस्थेने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
अंध बांधव ज्ञानेश्वरी ब्रेल लिपीत बोटांच्या स्पर्शाने वाचतात. त्यामुळे त्यांनाही अध्यात्माचा अनुभव घेता यावा आणि समाजात जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या पारायणासाठी सहभागी अंध बांधवांच्या निवास आणि भोजनाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांना या आगळ्यावेगळ्या पारायणास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले असून, या माध्यमातून अंध बांधवांच्या जिद्दीची आणि अध्यात्मिक प्रवासाची ओळख समाजाला होणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0