तुकाराम मुंडे यांच्या कार्यभार स्वीकारताच अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; नाशिकमध्ये 1 लाख 19 हजारांचा अन्नसाठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नाशिक जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली आहे. विविध ठिकाणी तपासणी करत प्रशासनाने भेसळीच्या संशयावरून आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करून तब्बल 1 लाख 19 हजार 712 रुपयांचा अन्नसाठा जप्त केला.
नाशिक ब्युरो |
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रशासनाने भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एनर्जी ड्रिंक्स व विविध खाद्यपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 27 मे 2026 रोजी नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 1 लाख 19 हजार 712 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
जेलरोड, नाशिकरोड येथील मे. अजनी ट्रेडर्स या पेढीची तपासणी केली असता संबंधित व्यवसाय विनापरवाना सुरू असल्याचे आढळून आले. येथे Cafenated Beverages (Sting) व Energy Drink या पदार्थांचे नमुने घेण्यात आले असून उर्वरित 31 हजार 680 रुपयांच्या 1584 बाटल्या भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आल्या.
मार्केट यार्ड, पंचवटी येथील मे. नेहा फूड प्रॉडक्ट्स येथे तपासणीदरम्यान Maida Papad Snacks या अन्नपदार्थाचे नमुने घेण्यात आले. 13 हजार 568 रुपयांचा 336 किलो साठा भेसळीचा संशय व मिथ्याछाप आढळल्याने जप्त करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर येथील मे. बालाजी ट्रेडिंग कंपनीमध्ये Refined Soyabean Oil खुले स्वरूपात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याठिकाणी 68 हजार 864 रुपयांचा 430 किलो साठा जप्त करण्यात आला.
इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे मे. गुरुदत्त छाया डेअरी होममध्ये अनारोग्यदायी परिस्थितीत पनीर उत्पादन व विक्री सुरू असल्याचे आढळून आले. याठिकाणी 3 हजार 200 रुपयांचा 10 किलो पनीर साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
तसेच सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे मे. स्वामी बेव्हरेजेस या पेढीवर कारवाई करत Sweetened Carbonated Beverages चे नमुने घेण्यात आले व 2 हजार 400 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
घेतलेले सर्व अन्न नमुने विश्लेषणासाठी संबंधित अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, संकेत येलमामे, गोविंदा गायकवाड, प्रतिक भड, सुहास मंडलिक, संदीप तोरणे यांनी केली. सहायक आयुक्त (अन्न) मनिष सानप, संदीप देवरे, दिनेश तांबोळी यांच्या उपस्थितीत तसेच सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभर विशेष पथके तयार केली असून उत्पादक व विक्रेत्यांवर सतत नजर ठेवण्यात येणार आहे. कुठेही आणि कधीही अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1

